पुणे (प्रतिनिधी) : पुणे महावितरण प्रादेशिक विभागात गेल्या ६ महिन्यांंत वीज चोरीची ५७१९ प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची १५१९ प्रकरणे उघड करण्यात आलेली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वीज चोरी विरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आलेली असून, ४७५६३ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे.

यामध्ये १६ कोटी ७ लाख रुपयांची एकूण ५७१९ वीज चोरीची, तर ६ कोटी ४३ लाख रुपयांची १५९१ अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. प्राप्त माहितीनुसार वीज चोरीच्या २४६३  प्रकरणात ८ कोटी ९३ लाख रुपयांची वसुली करण्यात आलेली असून अनधिकृत वीज वापराच्या ५२४ प्रकरणात एक कोटी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. पुणे परिमंडळात एकूण ११ हजार ६३६ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची ९५२ प्रकरणे व वीज चोरीची १५०२ प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

बारामती परिमंडळात एकूण १२ हजार ६८९  वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात  अनधिकृत वीज वापराची २४३ प्रकरणे व वीज चोरीची ३०२९  प्रकरणे उघडकीस आलेली आहे. कोल्हापूर परिमंडळात एकूण २३  हजार २३८ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची ३९६ प्रकरणे व वीज चोरीची ११८८ प्रकरणे उघडकीस आलेली आहे. आता यापुढे वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले असून, वीज चोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ व १३६ नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून, यात आरोपींना ३ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.