गगनबावडा (प्रतिनिधी) : अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक बदलासाठी, जागृतीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे,संवर्धन करणे, तसेच त्यांच्या तक्रारीचे सुलभतेने, विना विलंब आणि अल्पखर्चात निवारण करणे, हा ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश असल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्यसचिव अरुण वाघमारे यांनी सांगितले. ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या आढावा बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष बी. जे. पाटील होते.

वाघमारे म्हणाले की, दैनंदिन व्यवहारात भेसळयुक्त माल मिळणे, कमी प्रतीचा माल मिळणे, वजनमापात फसवणूक करणे, छापील किंमतीपेक्षा कमी किंवा जास्त किंमत आकारणे. यासाठी सजग ग्राहक बना, संस्थेचे सभासद बना, ग्राहक चळवळ सुदृढ करा. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे राज्य सदस्य एस. एन. पाटील, पुणे संघटक सुनिताराजे घाडगे, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, संघटक सुरेश माने, कोल्हापूर महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस, कोल्हापूर जिल्हा सचिव दादासो शेलार, दीप्ती कदम, प्रज्ञा यादव आदी उपस्थित होते.