मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडसाठी २०२२ वर्ष सरत आले असूनही फारसे फायद्याचे ठरलेले नाही. कोरोना काळ ओसरल्यावर धडाक्याने अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज झाले; पण त्यातील अनेक फ्लॉप ठरल्याचे अनुभव आले. परिणामी अनेक चित्रपट निर्माते सावध झाले असून, एका पाठोपाठ एक बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखापुढे ढकलल्या जाऊ लागल्या आहेत.

दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता प्रभास याचा आदिपुरुष जानेवारी २०२३ ऐवजी जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे, तर सलमान खानचा टायगर ३ पुढच्या वर्षीच्या ईद ऐवजी दिवाळीला आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२२ ऐवजी पुढच्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या शिवाय कतरिना कैफचा मेरी क्रिसमस, टायगर श्रॉफचा गणपत यंदाच्या नाताळऐवजी नंतर प्रदर्शित होणार आहेत. त्यांच्या तारखा जाहीर केल्या गेलेल्या नाहीत. यंदा नाताळमध्ये रणवीरचा ‘सर्कस’ प्रदर्शित होईल. २०२३ च्या व्हेलेंटाइन डे ला प्रदर्शित होणारा रॉकी आणि राणीकी प्रेम कहाणीची प्रदर्शित तारीखही पुढे ढकलली गेली आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्याबाबत निर्माते अनेक कारणे सांगत असले तरी या क्षेत्रातील तज्ञ आणि विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार कोरोना तिसऱ्या लाटेनंतर चित्रपट गृहे उघडली आणि चित्रपट मोठ्या संखेने रिलीज झाले; पण निर्मात्यांच्या हाती निराशाच लागली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मूड बदलेपर्यंत बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्यास कुणी तयार नाही. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी बाजारातून फिडबॅक घेतला जाईल आणि मगच हे चित्रपट थिएटरमध्ये येतील.

*अनेक निर्मात्यांकडून बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखापुढे ढकलल्या जाऊ लागल्या आहेत.*