कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकारामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाचीही समाजात पत निर्माण झाली असून, सहकारामुळेच गोरगरिबांची उन्नती झाली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ६९ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात ध्वजारोहण अध्यक्ष मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

मुश्रीफ म्हणाले, सहकारामधूनच तयार झालेली साखर कारखानदारी, बँकिंग व इतर अनेक संस्था यामुळेच राज्यासह देशाची आर्थिक घडी मजबूत आहे. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणसाचे जीवनमानही उंचावले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकाराचे योगदान मोठे आहे. सहकार चळवळ निकोप, पारदर्शक हवी. सहकाराचा स्वाहाकार होता कामा नये. यासाठी पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि नैतिकतेने काम केले पाहिजे.

यावेळी ज्येष्ठ संचालक आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. निवेदिता माने, अमल महाडिक, रणजितसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर आदी संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले. सहकार गीत प्रमोद व्हरांबळे यांनी गायले. प्रशासकीय व्यवस्थापक गोरख शिंदे यांनी आभार मानले.