गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मी आणि संजयबाबा कॉलेजपासूनचे जीवाभावाचे मित्र आहोत. एकाच क्रिकेट संघात आम्ही खेळलेले खेळाडू आहोत. दोघेही गेली ३०-३५ वर्षे संघर्ष करीत राहिलो. यापुढे आम्ही दोघेही उर्वरित आयुष्य जनकल्याणासाठी खर्ची घालणार आहोत, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील व्हनाळी येथील शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. संजयबाबा घाटगे होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, संजयबाबा घाटगे यांनी प्रामाणिकपणे काम करून जीवाभावाची माणसे जपली. कोणत्याही फार मोठ्या राजकीय सत्ता नसतानाही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठाम राहिले, हे त्यांचे फार मोठे काम आहे. दोघांनीही शेतकरी केंद्रबिंदू मानून आजपर्यंत काम केले आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता तसेच गोरगरीब यांच्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात शेतकरी, सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी व संययबाबा आमच्या राहिलेल्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांची सेवा करीत राहू.

संजयबाबा घाटगे म्हणाले, मी व हसन मुश्रीफ कॉलेज जीवनात सहा वर्षे एकमेकांचे मित्र असून, मधल्या काळात राजकीय घडामो़डीमुळे आमच्यात फारकत आली असली तरी आम्ही एकमेकांचे शत्रू कधीच नव्हतो आणि नाही. त्यामुळे नेहमीच तालुक्याच्य़ा विकासाच्या मुद्यावर आम्ही एकसंघपणे काम करणार आहोत. अन्नपूर्णा शुगरच्या उभारणीत मुश्रीफांचे मोठे योगदान लाभले आहे.

अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, अन्नपूर्णा पाणी योजनेमुळेच पंचक्रोशीत गतवैभव प्राप्त झाले आहे. विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करत असताना मुश्रीफ यांनी विकासाच्या अनेक योजना वाडीवस्तीपर्यंत पोहोचवून तालुक्याचा कायापालट केला आहे. आ. मुश्रीफ यांनी गट-तट, पक्ष -पार्टी न बघता विकासकामांच्या माध्यमातून गावेच्या गावे समृद्ध केली; परंतु काहीजण मंजूर झालेली कामे रोखण्यातच धन्यता मानत आहेत. मंजूर निधी रोखणे हा कसला पुरुषार्थ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, धनराज घाटगे, प्रवीणसिहं भोसले, के. बी. वाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दत्तोपंत वालावलकर, के. के. पाटील, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, महेश देशपांडे, धनाजी गोधडे, ए. वाय. पाटील, सूर्यकांत पाटील, रणजित मुडूकशिवाले, प्रकाश वाडकर, सुरेश पाटील, विश्वास पाटील, सुरेश मर्दाने, उत्तम वाडकर, पप्पू पोवार, योगेश कुळवमोडे, रमेश जाधव, नामदेव गुरव आदी प्रमुख उपस्थीत होते.