कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्यरंजन स्पर्धेत औरंगाबाद प्रादेशिक विभागातील नांदेड परिमंडळाच्या ‘नजरकैद’ ला नाट्यनिर्मितीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे परिमंडळाच्या ‘सवाल अंधाराचा’ ला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. यावेळी महावितरणचे संचालक संजय ताकसांडे आणि सिनेअभिनेते ऋषिकेश जोशी यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

ताकसांडे यांनी, कोल्हापूर ही कलावंतांची भूमी आहे. कलाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत महावितरणच्या नाट्यस्पर्धा होणे ही अभिमानाची बाब आहे. महावितरण नाट्यकलावंतांची खाण असल्याचे मत व्यक्त केले.

ऋषिकेश जोशी यांनी, मी ही तुमच्यासारखा नाटक करीत इथपर्यंत पोहचलो’. कोल्हापूरने मला घडविले असल्याची भावना मांडली. महावितरणमध्ये अनेक उत्तम कलाकार व लेखकही आहेत. या नाट्यस्पर्धेने त्यांना मंच दिला. मराठी रंगभूमीच्या सेवेसाठी महावितरणचे हे पाऊल स्तुत्य असल्याचे सांगितले.

यावेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता विजय भटकर, सचिन तालेवार,  सुनिल देशपांडे, दत्तात्रय पडळकर, कैलास हुमणे, मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदी उपस्थित होते.