कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. दळणवळण बंद होते. अनेकांना याचा मोठा फटका बसला. पण, त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्षयरुग्णांच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट घडली होती. या काळात या रुग्णांची संख्या कमी झाली होती. आता कोरोचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्याचवेळी याचा परिणाम म्हणून क्षयरुग्णांची संख्या वाढली आहेक्षयरुग्णांच्या (टीबी) जिल्हयातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नेमके हेच झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात क्षयरुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मास्कसह सोशल डिस्टन्सिंग पथ्यावर पडले होते. मात्र, कोरोना हटला आणि वर्षभरात क्षयरुग्णांची संख्या पूर्वपदावर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाच्या काळात म्हणजे २०१९ च्या  तुलनेत २०२० साली  रुग्णसंख्या हजाराने घटली होती. गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट राहिली होती.

या वर्षातही रुग्ण कमी झाले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले. साहजिकच श्वसनाशी संबंधित संसर्गजन्य आजारांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा क्षयरुग्णांची संख्या ऑक्टोबर अखेरीसच गतवर्षाच्या रुग्णसंख्येपर्यंत पोचली आहे. सर्वसाधारणपणे लोकांनी शिंकताना, खोकताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुठेही थुंकणे टाळले पाहिजे. यातून आजारांच्या संसर्गाची शक्यता वाढते,  अशी सुचना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी केली आहे.