कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमणे काढून टाकण्याचा कालबद्ध आराखडा निश्चित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होणार असली तरी त्यामुळे जिल्ह्यातील सव्वालाखांहून अधिक अतिक्रमणे निघणार असून, सुमारे ६ लाख नागरिक बेघर होणार आहेत.

गेल्या काही वर्षांत वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत राहण्यासाठी गावानजीक स्वमालकीची जमीन नसल्यामुळे ग्रामस्थांनी शासकीय जमिनीमध्ये घरे बांधली आहेत. ही घरे हटविल्यास नागरिकांचा हक्काचा निवारा नाहीसा होणार आहे. त्यामुळे शासनाने अतिक्रमण कारवाई थांबविण्याबाबत उच्च न्यायालयात तत्काळ याचिका दाखल करावी आणि अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या सर्वपक्षीय महामोर्चामध्ये जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.