लाहोर (वृत्तसंस्था) : टी-२० वर्ल्डकपमध्ये गुरुवारी उपांत्य फेरीमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला. इंग्लंडकडून भारताचा १० गडी राखून पराभव झाल्यामुळे भारत या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. या मानहानीकारक पराभवाने भारतावर चाहते संतापले असून, सर्वस्तरातून भारतावर टीका सुरू आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही ट्विट करत भारताची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करत भारताला लक्ष्य करत डिवचण्याची संधी सोडली नाही.

भारताचा पराभव करून इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तिथे त्याची अंतिम लढत पाकिस्तानबरोबर होणार आहे. पाकिस्तानना नशिबाने साथ दिल्यानेच सुपर लढतीतच बाहेर पडण्याची शक्यता असणाऱ्या पाकला अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी मिळाली. पाकने उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार खेळी करत अर्धशतके ठोकली आणि पाकिस्तानने सहज सामना जिंकला. पाकिस्तानने १३ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.

गुरूवारी भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘तर आता या रविवारी १५२/० आणि १७०/० या दोघांमध्ये अंतिम लढत होणार आहे.’ गेल्यावर्षी यूएईमध्ये टी-२० विश्वचषक पार पडला होता. यामध्ये पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. त्यावेळी दुबईत झालेल्या या उपांत्य फेरीमधील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने एकही गडी न गमावता १५२ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे गेल्यावर्षी पाकिस्तानने भारताचा केलेला पराभव आणि आत्ता इंग्लंडने यावेळी भारताचा केलेला पराभव या दोन्हींचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे.