कोल्हापूर (प्रतिनिधी) : एन.डी.डी.बी (मृदा), जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व सिस्टीमा कंपनी यांच्या संयुक्त सहकार्यातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी कार्बन क्रेडिट योजने अंतर्गत ५००० बायोगॅस प्लान्टची उभारणी करण्यात येणार आहे.

कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेमध्ये दूध उत्पादक महिलांना, धूर  धूळ विरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे. शेण वाहून नेणे, शेणी लावणे या कामातून महिलांना सुटका मिळावी व गॅस सिलिंडरच्या खर्चात बचत व्हावी, स्लरीच्या माध्यमातून सेंद्रिय खत शेतीला मिळावे. परिसरातील हवा स्वच्छ, शुद्ध राहावी या हेतूने कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना गोकुळकडून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, कार्बन क्रेडिट योजना २०२३ अखेर गोकुळ महिला दूध उत्पादकांसाठी राबवित आहे. यामध्ये २ घन मी., २.५ घन मी., ३ घन मी., ४ घन मी. ५ घन मी. पर्यंत क्षमतेचे बायोगॅस उपलब्ध असणार आहेत. या बायोगॅसच्या मेंटेनन्स सिस्टीमा कंपनी १० वर्षे पाहणार आहे.

२ घन मी.च्या बायोगॅस प्लान्टची किमंत रु.४१,२६० इतकी असून, गोकुळच्या दूध उत्पादक कुटुंबाला हा बायोगॅस प्लान्ट रु.५,९९० इतक्या कमी रक्कमेमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. २.५ घन मी. च्या प्लान्टची किमंत रु.४९,५०० इतकी असून सदर बायोगॅस प्लान्ट रु १०,४९० इतक्या किमंतीस उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये बायोगॅस प्लान्ट उभारणीसह डबल बर्नर गॅस स्टोव्ह दिला जाणार आहे. कार्बन क्रेडिट बायोगॅस योजने अंतर्गत रु.४१,२६० किमतीचे २ घन मी. क्षमतेचे बायोगॅस रु ५,९९० इतक्या किमतीमध्ये दूध उत्पादक कुटुंबाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रति लाभार्थी ३५,२७० रु.अनुदान मिळणार आहे.

एकूण रु. २० कोटी ६३ लाख किमतीचा कार्बन क्रेडिट बायोगॅस प्रोजेक्ट २०२३ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. इच्छुक दूध उत्पादकांनी संबधित दूध संस्थेमध्ये नाव नोदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन विश्वास पाटील यांनी केले आहे. यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, संपदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.