कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही गतिमान होत आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिक बेघर होणार असून त्यांच्या निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यानी आवाज उठवला आहे. त्यांनी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असल्याची माहीती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिरोळ तालुकाध्यक्षा साबेरा इंगळे यानी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शासनाने अगोदर अतिक्रमणधारकांच्या निवाऱ्याची सोय करावी. ज्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई होणार आहे त्यांना एकटे पडू दिले जाणार नाही. यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद अतिक्रमणधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून यासाठी  राज्यस्तरीय लढा उभारला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.