टोप (प्रतिनिधी) : शिरोली ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे आणि ग्रामस्थांची दिशाभूल करणारे आहेत. त्यांनी माहिती अधिकारातून खर्चाचे जे आकडे जाहीर केले, त्यापेक्षा जादा खर्च महाडिक आघाडीची सत्ता असताना झाला आहे. मग ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असे कसे म्हणता येईल. निवडणुकीसाठी त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, चौकशीकामी प्रशासनाला सर्व सहकार्य करणार आहे. आगामी काळात महाडिक नेतृत्वाने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, शिरोली गावातील तीन वर्षांतील लेखाजोखा पाहण्यापेक्षा मागील तीस वर्षांचा लेखाजोखा करायला पाहिजे. तसेच जि.प.च्या माजी सदस्या शौमिका महाडिक, पंचायत समितीच्या माजी सदस्या सोनाली पाटील यांच्याही कामाची चौकशी करायला पाहिजे. गावातील मेन रोडसाठी १ कोटी ९२ लाखांचा रस्ता केला त्यावेळी मोठा भ्रष्टाचार झाला असून, मंजूर असलेल्या सिमेंटसह इतर साहित्य देखील निकृष्ट दर्जाचे वापरले. तसेच ९२ लाखांचा रस्ता झाला असून, १ कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही खवरे यानी केला. माजी आमदारांनी अतिक्रमण काढण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता; पण आता गायरान वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र या असे सांगत आहेत, हे आताच कसे सुचले असा प्रश्न खवरेंनी उपस्थित केला.

उपसरपंच सुरेश यादव म्हणाले, ग्रामपंचायतीमधील प्रत्येक मीटिंगला खर्च वाचून दाखवला जात होता; मग ग्रामपंचायतीमधील विरोधक सदस्य तेव्हा का बोले नाही. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर आरोप करत आहेत. यामुळे या आरोपाची खुशाल चौकशी करावी. आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.