पेठवडगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथील उड्डाणपुलाच्या खाली जलवाहिनी टाकण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे उड्डाणपूल असून, या उड्डाण पुलाखालून मोठ्या प्रमाणावर वारणानगरला जाण्यासाठी वाहतूक सुरू असते; परंतु पावसाळ्यात या उड्डाणपुलाच्या खाली पाणी साठत असल्यामुळे वारंवार वाहतुकीला अडथळा येत होता. या उड्डाण पुलाखाली अनेकांनी हातगाड्या उघडल्यामुळे वाहतुकीची अडचण होत होती.

पाणी जाण्यासाठी येथे व्यवस्था नसल्याने पाणी साचून छोटे-मोठे अपघात होत होते. याबाबत वाठार ग्रामपंचायतीतर्फे महामार्ग प्राधिकरणाला जमिनीखालून जलवाहीनी टाकण्याबाबत निवेदन दिले होते; परंतु संबंधित यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर वाठार ग्रामपंचायतीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्राधिकरणाने गटारींची स्वच्छता करून उड्डाण पुलाखाली कायमस्वरूपी जलवाहिनी व चेंबर टाकण्याचे काम सुरू केले आहे.