कोल्हापूर (प्रतिनिधी) : गायरान जमीन अतिक्रमण धारकांच्या घराच्या प्रश्न हा त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. अतिक्रमणात बांधकामे केलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत आमदार म्हणून आपण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. राज्य शासनाने सकारात्मक पाऊले उचलावीत, अन्यथा लोकांच्या सोबत राहून उग्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावातील गायरान जमिनीत अनेक कुटुंबे सध्या रहात आहेत. गावठाणमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने अनेक लोक हे गायरानमध्ये स्थलांतरित झाले आहेत. अनेकांनी कच्ची घरे, पक्की घरे तसेच बंगले बांधले आहेत. आयुष्यभराची कमाई एकत्र करुन, कर्ज काढून, प्रसंगी उसनवारी करुन स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न या लोकांनी पूर्ण केले आहे. आता जर ही घरे काढली तर हे लोक बेघर होणार आहेत.इतके दिवस राहणारे हे लोक जाणार कुठे ? हा प्रश्न आहे.  त्यामुळे लोकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे  वागावांत या निर्णया विरोधात सर्वपक्षीय लोक एकत्र येऊ लागले आहेत. लाखो कुटुंबाशी हा विषय संबधित आहे. या गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालून सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाचा हा जरी निर्णय असला तरी राज्य शासनाने याबाबत योग्य पावले उचलावीत अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा आ. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला.