मुंबई (प्रतिनिधी) :  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या घरात छापेमारी करून ईडीने त्यांना ताब्यात घेतले. संपूर्ण चौकशीअंती ईडीने त्यांना अटक केली. ३१ जुलै रोजी त्यांना अटक करण्यता आली होती. मात्र, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती, असा महत्त्वाचा निर्वाळा पीएमएलए कोर्टाने दिला. यावरून पीएमएलए कोर्टाने ईडीला झापले आहे.

संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर होती. या प्रकरणात ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले, राकेश आणि सारंग वाधवान हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अवैधरित्या पकडलं, असं पीएमएलए कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. तसंच, संजय राऊत आरोपी आहेत, याचे पुरावे द्या असंही कोर्टाने ईडीला म्हटले आहे.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र या जामिनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने केलेली याचिका पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावल्याने ईडीने याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मुंबई हायकोर्टानेही ईडीची याचिका फेटाळून लावत संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.