मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची निवडणूक डिसेंबरमध्ये होत असून, या निवडणुकासंदर्भात नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान, १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्‍हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. ३१ मे २०२२ पर्यंत अस्‍तित्‍वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. जिल्‍ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ४२९, तर डिसेंबर महिन्यामध्ये ४५ ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील १२ तालुक्यात निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती :  करवीर- ५३, कागल- २६, पन्हाळा- ५०, शाहूवाडी- ४९, हातकणंगले- ३९, शिरोळ- १७, राधानगरी-६६, गगनबावडा-२१, गडहिंग्लज- ३४, आजरा- ३६, भुदरगड- ४४, चंदगड- ४०.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी  केली.

नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५  डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.