कोल्हापूर (प्रतिनिधी) : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली काढण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ. एम. एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणूक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ. प्रल्हाद माने तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण (डिटन्स लर्निंग) इमारतपासून सुरुवात झाली. सायबर चौक ते माऊली चौक, सम्राटनगर, एनसीसी भवन शिवाजी युनिव्हर्सिटी गेट, विद्यापीठाच्या जिजामाता सभागृह या मार्गाने रॅली मार्गस्थ झाली. रॅलीत सहभागी विद्यार्थी/नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.