गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्यातील अनेक समस्या दूर कारखान्याला ऊर्जितावस्था आणून सभासदांचे हित जोपासले जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

‘गोडसाखर’ कारखान्याच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना आ. मुश्रीफ म्हणाले, सर्व सभासद, हितचिंतक, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी यांनी छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व उमेदवार निवडून दिले व आमच्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मनःपूर्वक मी आभार मानतो. कारखान्याचे माजी चेअरमन व आघाडीप्रमुख डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांची जबाबदारी वाढली आहे. कारण, ही निवडणूक हा कारखाना बंद पाडणारे आणि हा कारखाना चालू करणारे, या विषयाभोवतीच केंद्रित झाली होती आणि सर्व सभासदांनी कारखाना चालू करणाऱ्यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे ही जबाबदारी अधिकपटीने वाढली आहे. आता डॉ. शहापूरकर,  प्रकाश चव्हाण आणि सर्व संचालक मंडळ जो काय निर्णय घेतील. म्हणजेच स्वबळावर चालवणे, शासनाच्या निर्णयाप्रमाणे चालवण्यास देणे याबाबत त्यांची जी भूमिका असेल त्यांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा राहीन आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसुद्धा यामध्ये सकारात्मक सहकार्य करील.

मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीमध्ये काही मंडळींनी प्रचार फारच खालच्या पातळीला नेलेला होता; परंतु आम्ही त्यांना उत्तर देण्याच्या नादाला न लागता कारखाना आम्ही कसा सुरू करणार आहोत आणि यापूर्वीच्या ब्रिस्क कंपनीचा अनुभव आम्ही कथाकथन करीत होतो. अलीकडच्या काळात कामगारांना २० महिन्याचा पगार नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांची देय असलेली देणी दिलेली नाहीत. सभासदांना हक्काची साखर नाही. तोडणी-वाहतुकीच्या निमित्ताने व्यवसाय नसलेल्या तरुणांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. अशा अनेक समस्या या कारखान्यांमध्ये निर्माण झालेल्या होत्या. त्या दूर करणे ही प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी या नवनिर्वाचित संचालक मंडळाची आहे. या सगळ्यात शेतकरी सभासदाने दाखवलेला जो विश्वास आहे, तो सार्थ ठरविण्याची कामगिरी आम्हाला पार पाडावी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.