मुंबई (प्रतिनिधी) : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे कान टोचले. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार की नाही, यावर बोलणे फडणवीसांनी टाळले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. सत्तारांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. आम्ही या वक्तव्याचा विरोधच करु. राजकारणात आचारसंहिता पाळायलाच हवी. ही आचारसंहिता ज्याप्रमाणे आम्हाला लागू आहे, त्याप्रमामे ही आचारसंहिता विरोधकांनाही लागू आहे.

फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, विरोधकही ज्याप्रमाणे खोके-बोके अशी टीका करतात, तीदेखील चुकीची आहे. दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी येवढ्या खाली जाऊ नये, असे मला वाटते. तसेच, त्या-त्या पक्षातील मोठे नेते आपल्या नेत्यांना याबद्दल काही सांगत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.