मुंबई (प्रतिनधी) : संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्येबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार जगाची लोकसंख्या १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ८ अब्जांवर जाणार आहे. १९५० मध्ये जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. याचाच अर्थ इतक्या वर्षात लोकसंख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे.

अंदाजानुसार २०५० पर्यंत लोकसंख्येचा आकडा ९.४ अब्ज तर २०८० पर्यंत १०.४ अब्जांवर जाईल. तसेच २०५० पर्यंत माणसाचे सरासरी आयुष्यमान ७७.२ वर्षांवर जाणार आहे. २०३० सालापर्यंत जगाची लोकसंख्या आणखी ५० कोटींनी वाढून ८.५ अब्जांवर जाईल, असे जनसंख्या निधी विभाग रचेल स्ट्रो यांचे म्हणणे आहे. याचा थेट परिणाम मजूर, राष्ट्रीय पेन्शन सिस्टीमवर होणार आहे.

रचेल यांच्या म्हणण्यानुसार वाढणारी लोकसंख्या आणि वाढलेले आयुष्यमान हे मानवतेसाठी मैलाचे दगड आहेत. पुढच्या दशकात लोकसंख्या वाढ सुरूच राहणार आहे. १९६० च्या दशकात लोकसंख्येचा उच्चतम स्तर गाठला गेला होता; मात्र त्यानंतर अचानक त्यात घट होऊ लागली. २०२० मध्ये लोकसंख्या वाढीचा दर १ टक्क्याच्या खाली होता. २०५० पर्यंत प्रजनन दर घटून ०.५ टक्क्यावर जाईल आणि त्यामानाने वाढत्या वयाची लोकसंख्या अधिक असेल. प्रजनन दरात घट आणि सरासरी आयुष्यवाढ असे हे दृश्य आहे. २०५० पर्यंत जी लोकसंख्या वाढ अपेक्षित आहे त्यातील अर्धी जगातील आठ देशातच असेल. त्यात कांगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि तंजानिया या देशांचा समावेश आहे.