कोल्हापूर (प्रतिनिधी) : गायरान जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलन कारवाई थांबावी, यासाठी अतिक्रमणधारकांच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करून न्यायालयीन लढा लढणार असल्याची ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हा नेते सतीश माळगे यांनी दिली.

सतीश माळगे यांनी वसगडे, तामगाव व इतर गावांतील अतिक्रमणधारकांच्या भेटी घेऊन त्यांना धीर दिला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या लढाईत रिपाइं आठवले पक्ष अतिक्रमणधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही गतिमान होत असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिक बेघर होणार असून, त्यांच्या निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यांचे संसार कुटुंब उघड्यावर येणार असून, जनावरांची निवारा जाणार आहे.

उच्च न्यायालयाने स्वतः राज्यातील सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलनबाबत याचिका दाखल केली होती व या याचिकेवर सुनावणी होऊन राज्यातील सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबत व त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने तातडीने करून या जमिनी अतिक्रमणमुक्त कराव्याबाबत निर्देश दिले. राज्य सरकारनेही न्यायालयाचे निकालानुसार अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी प्रांत व तहसीलदार यांच्या समित्या गठीत केल्या आहेत. ३१ डिसेंबरअखेर अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही पूर्ण करण्याची असल्याने प्रशासनाने या बाबत कंबर कसली आहे.

रिपाइं आठवले पक्षाकडून लवकरच कायदे तज्ञांशी सल्लामसलत करून येत्या दोन-तीन दिवसांत ही कार्यवाही थांबावी यासाठी याचिका दाखल करणार असून, नागरिकांना कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन रिपाइंचे नेते सतीश माळगे यांनी केले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे अमेरिका दौऱ्यावरून भारतात परत आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी महसूलमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे  झोपडपट्टी विभागाचे अध्यक्ष सुमीत वांजळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिल्याचे  असे माळगे यांनी सांगितले. यावेळी भदंत आर. आनंद, वसगडेचे भानुदास भोसले, माणिक कांबळे, विजय गोंदणे, बाबासो कांबळे आणि अतिक्रमणधारक कार्यकर्ते उपस्थित होते.