कोल्हापूर (प्रतिनिधी) : वर्षातील दुसरे खग्रास चंद्रग्रहण हे दि.८ नोव्हेंबर होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, उत्तरआणि पूर्व युरोपचे काही भाग आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतेक भागातून दिसणार आहे, तर भारतातून चंद्रोदयानंतर खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. खग्रास चंद्रग्रहणाची सुरवात दुपारी ३.४६ वा. होणार असून, ५ वाजून ११ मिनिटांनी हे ग्रहण सुटणार आहे.

कोल्हापुरातून मात्र खंडग्रास आणि छायाकल्प चंद्रग्रहण पाहता येईल. कोल्हापुरातून संध्याकाळी ०५ वाजून ५८ मिनिटांनी म्हणजेच चंद्र उदय झाल्यापासून २१ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. या चंद्रग्रहणाचा मध्य संध्याकाळी ६ वाजता जेव्हा चंद्र क्षितिजाच्या वर असताना असेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण संध्याकाळ ६ वाजून १९ मिनिटांनी पूर्ण होईल. त्यानंतर ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण पाहता येईल. ग्रहण पाहण्यासाठी पूर्व किंवा पूर्व-ईशान्य दिशेला कोणताही अडथळा नसलेले उंच ठिकाण निवडावे असे शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी सुचवले आहे.
शिवाजी विद्यापीठात भौतिक शास्त्र विभागातील विद्यार्थी अवकाशविज्ञान प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या C+5 सेलेस्ट्रोन दुर्बिणीद्वारे या चंद्रग्रहणाचे निरीक्षण करणार आहेत. निरीक्षणासाठी खगोलप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी नॅनो-सायन्सच्या इमारतीच्या वरील भागात उपस्थित राहावे, असे असे आवाहन अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.