वारणानगर (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रातील अतिक्रमणाबाबत बातम्या पाहून जिल्हातीलच नाही तर राज्यतील जनता हडबडली आहे. या बाबत शासनस्तरावर योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून मुख्यमंत्र्यांशी लवकर बोलून अंबपच काय, कोल्हापूर जिल्हातील सर्व सामान्य माणसाने कष्टातून उभा केलेल्या संसाराचा प्रपंच मोडू देणार नाही. प्रसंगी खासदारकीवर पाणी सोडू ;पण लोकांसाठी रस्त्यावरची लढाई करू, सरकारला सर्वोच्च न्यायालयात दाद मागायला भाग पाडू, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला.

अंबप येथे विजयसिंह माने, विकासराव माने यांनी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार धैर्यशील माने बोलत होते. माजी सरपंच विश्वनाथ पाटील तात्या, राजेंद्र माने, युवा नेते प्रसाद पाटील, झाकीर भालदार, संपतराव कांबळे, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, सरपंच बी. एस. अंबपकर, डॉ. विभा पाटील, संतोष उंडे, अंबप ग्रा.पं. चे सदस्य व अंबप गावातील अतिक्रमणधारक नागरिक उपस्थित होते. तसेच पाडळी, कासारवाडी, अंबपवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते नागरिक यांनी खासदार माने यांना विकासकामांच्या मागणीबाबतची निवेदने दिली. माजी सरपंच संपतराव कांबळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र माने यांनी आभार मानले.