कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. भारती पाटील यांच्या अध्ययनातून नव्या जाणिवेचा डोळस विद्यार्थी घडविलेला आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. किशोर बेडकीहाळ यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, माजी विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीने राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. भारती पाटील यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत अशोक चौसाळकर होते.

डॉ. बेडकीहाळ म्हणाले की, शिक्षक कसा असावा व कसा असला पाहिजे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. भारती पाटील होत. प्राध्यापक आणि सामाजिक चळवळीमध्ये मार्गदर्शक अशी त्यांची दोन रुपे आहेत. उपक्रमशीलता, सकारात्मकता, कामात व्यस्त, सामाजिकता आणि मूल्यात्मकता हे त्यांचे गुण सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी शिबिरातून मार्गदर्शन करून चांगले कार्यकर्ते घडवले तर जाहीर सभा व व्याख्यानातून चांगला सुसंस्कृत नागरी समाज घडावा या दृष्टीने त्यांनी व्याख्याने दिली.

डॉ. आनंद मेणसे म्हणाले की, सध्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये धोक्यात आलेली आहेत. ते आव्हान पेलण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. भारती पाटील यांनी नेतृत्व करावे. गांधी आणि मार्क्सवादाचा विचार यांची सांगड कशी घालावी, याचा विचार डॉ. भारती पाटील यांनी मांडलेला आहे. सरोज ऊर्फ माई पाटील म्हणाल्या, डॉ. भारती पाटील ही सत्याला सत्य मानणारी, असत्याला सत्य मानणारी व विद्यार्थ्यांचे चेहरे वाचणारी आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोचणारी आदर्श शिक्षिका आहे. शिक्षकांनी लोकशाहीचे प्रबोधन करण्यासाठी आता पुढे आले पाहिजे.

डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, प्रशासन अध्ययन, संशोधन, प्रबोधन यामध्ये डॉ. भारती पाटील समतोल साधक कार्यरत राहिल्या. सन्मान पत्राचे वाचन प्रा. डॉ. शिवाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. टी. एस. पाटील, डॉ. अमिता कणेगांवकर, मिलिंद अष्टेकर, किरण लाड उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी, स्वागत प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी, तर सूत्रसंचालन श्रेयश मोहिते व बाहुबली राजमाने यांनी केले. प्रा. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले.