मुंबई (प्रतिनिधी) बॉलिवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली, तरुणांच्या दिलाची धडकन, जान्हवी कपूर हिने मुंबईच्या पॉश पाली हिल भागात अलिशान डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. या घराची किंमत ६५ कोटी रुपये सांगितली जात आहे.

बॉलिवूडमध्ये येऊन जान्हवीला अवघी पाच वर्षेच झाली आहेत. अर्थात नवे घर तिने बहीण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्यासह एकत्र खरेदी केले असल्याचे समजते. या भागात जागांचा दर १ लाख रुपये चौरस फूट आहे. रियल इस्टेट पोर्टल इंडेक्सटॅप डॉट कॉमवरील माहितीनुसार १२ ऑक्टोबर रोजी या घराची नोंदणी जान्हवीने केली असून, त्यासाठी ३.९० कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे.

जान्हवीचे नवे घर पहिला आणि दुसरा मजला असे डुप्लेक्स असून, त्याला पाच कार पार्किंग आहेत. हे घर ६४२१ चौरस फूट आहे. पहिल्या मजल्यावर स्विमिंग पूल आणि ओपन गार्डन आहे. पाली हिल हा बांद्रयाचा अतिशय पॉश एरिया आहे आणि येथे अनेक सेलेब्रिटी, उद्योगपती राहतात. जुलैमध्ये जान्हवीने तिचे ३४५६ चौरस फुटाचे पहिले घर बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याला ४४ कोटींना विकले होते, असे समजते.

आगामी काळात जान्हवीचे अनेक चित्रपट येत आहेत. त्या पैकी ‘मिली’ ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे, मिस्टर अँड मिसेस माही, बवाल हे तिचे आणखी काही आगामी चित्रपट आहेत.