शिर्डी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा स्थितीतही त्यांनी आज शिर्डी येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते कार्यकर्त्यांना सविस्तरपणे संबोधित करू शकले नाहीत. त्यांनी आपले भाषण थोडक्यात उरकले. उर्वरित भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. प्रकृती ठीक नसूनही ते शिर्डी येथे सुरू असलेल्या मंथन शिबिराला उपस्थित राहिले होते.

भाषणात शरद पवार म्हणाले की, मी सगळ्यांची भाषणे ऐकली नाहीत, पण काही भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढेच सांगू इच्छितो की, आज मला सविस्तर बोलणे शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसा सल्ला दिला आहे. आणखी १० ते १५ दिवसांनी मला नेहमीचं काम करता येईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण या शिबिरातीन एक संदेश जात आहे की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.

शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी १५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असताना त्यांनी शिर्डीत आज राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरास उपस्थिती लावली. आज या शिबिराचा शेवटचा दिवस होता. आज शिबिर आटोपल्यावर पवार हे पुन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.