कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा- २०२२-२३ ‘नाट्यरंजन’ च्या यजमानपदाचा बहुमान ‘कलानगरी’ कोल्हापूरला मिळाला आहे. आंतर परिमंडळीय नाट्यस्पर्धेतील विजेते नागपूर, औरंगाबाद, कोंकण व पुणे या प्रादेशिक विभागाचे नाट्यसंघ कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दि. १० व ११ नोव्हेंबर रोजी हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिली आहे.

या नाट्यस्पर्धेचे आयोजन राज्यातील १६ परिमंडळासाठी संबंधित प्रादेशिकस्तरावर केले जाते. या पहिल्या फेरीत प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले नाट्यसंघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी आहेत.

कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. नागपूर विभागातील विजेता चंद्रपूर परिमंडळाचा संघ प्र.ल. मयेकर यांनी लिखित  ‘तो परत आलाय ‘ हे नाटक  सादर करणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० वा. कोकण प्रादेशिक विभागातून विजेता प्रकाशगड मुख्यालय संघ इरफान मुजावर  यांनी लिखित  ‘सलवा जुडूम’ हे नाटक सादर करणार आहे. दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. पहिल्या सत्रात औरंगाबाद विभागातील विजेता नांदेड परिमंडळाचा संघ अभिजित वाईकर यांनी लिखित ‘नजरकैद ‘ हे नाटक, तर दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता पुणे प्रादेशिक विभागातील विजेत्या परिमंडळाचा संघ नाटक सादर करणार आहे.

नाट्यस्पर्धेचे उद्घाटन दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. संजय ताकसांडे, (संचालक, संचलन) यांच्या हस्ते होणार आहे. पारितोषिक वितरण दि.११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (भाप्रसे) यांच्या  हस्ते होणार आहे. विशेष अतिथी कोल्हापूरचे सुपुत्र अभिनेते, दिग्दर्शक ऋषिकेश जोशी हे उपस्थित राहणार आहेत. या नाट्यस्पर्धेसाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे, असे परेश भागवत यांनी म्हटले आहे.