दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गीत ‘जन गण मन’ आणि वंदे मातरमला समान दर्जा असून, नागरिकांनी दोन्हींचा आदर राखला पाहिजे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

‘जन गण मन’ सारखा ‘वंदे मातरम’लाही राष्ट्रगीताचा दर्जा आणि सन्मान मिळायला हवा, अशी मागणी या अर्जात करण्यात आली होती. याशिवाय राष्ट्रगीताच्या आदराबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर उच्च न्यायालयाने गृह, शिक्षण, सांस्कृतिक आणि कायदा मंत्रालयाला नोटीस बजावून त्याचे उत्तर मागवले होते.

शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक कामकाजाच्या दिवशी जन गण मन आणि वंदे मातरम हे गीत गायले जावे, असा आदेश केंद्र आणि राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणीही या अर्जात करण्यात आली आहे. याशिवाय, २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत पारित झालेल्या ठरावानुसार, दोन्हींच्याही सन्मानासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत. याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय म्हणाले, ‘भारत हा राज्यांचा संघ आहे. हा महासंघ नाही. आमचे एकच राष्ट्रीयत्व आहे आणि ते म्हणजे भारतीयत्व! वंदे मातरमचा आदर करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.’