मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२०विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने मध्येच उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत.

यंदाच्या विश्वचषकमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. अशातच उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये पावसामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही, याचा विचार करण्यात आला असून, त्यानुसार विश्वचषकच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा निकाल लावण्यासाठी दोन्ही डावात प्रत्येकी १० षटके टाकणे बंधनकारक असणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. त्यामुळे आता आयसीसीच्या नव्या नियमानुसार, कोणत्याही सामन्यामध्ये १० षटके पूर्ण झाले नसतील तर सामन्याचा निकाल लागणार नाही.

याशिवाय एखादा सामना टाय झाला, पाऊस आला किंवा इतर कारणांमुळे सामना नियोजित दिवशी खेळवला जाऊ शकला नाही, तर हे महत्त्वाचे सामने राखीव दिवशी खेळवले जातील. मात्र, मॅच ऑफिशियल्सने त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यावर भर द्यावा.

जर सामना नियोजित वेळेवर सुरू झाला आणि सामना सुरु असतनाच पाऊस आला किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यावेळी सामना पुन्हा सुरू होऊ शकत नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता तिथूनच पुढे सुरु केला जाईल. आयसीसीचा हा निर्णय फॅन्स आणि क्रिकेट टीम दोघांसाठीही चांगला आणि आनंदाचा ठरू शकतो.