Breaking News

 

 

पावसाळ्यात हानी टाळण्यासाठी काटेकोर आपत्ती व्यवस्थापन करावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मान्सूनच्या काळात आपत्तीमुळे होणारी संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाचे गांभिर्याने व काटेकोरपणे नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अद्ययावत करावा. या  काळामध्ये संबंधीत विभागप्रमुखांनी परवानगीशिवाय विनाअनुमती मुख्यालय सोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. मान्सून काळातील जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीत दक्षता घेण्यासाठी आज (बुधवार) आयोजित करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होते.

या बैठकीत २००५ साली जिल्ह्यात झालेल्या महापुराच्या स्थितीनुसार प्रत्येक विभागाने तयार केलेला आराखडा सदर करण्यात आला. यामध्ये संभाव्य पूररेषा या रेषेच्या आतील लोकवस्ती निश्चित करून प्रत्येक विभागाकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी पूर परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेने दरवर्षी चांगले काम केल्याचे सांगितले.  अग्निशामक दलाची सज्जता, उद्यान विभागातर्फे झाडाच्या फांद्या तोडणे, पूर रेषेच्या आतील लोकवस्ती निश्चित करून स्थलांतराचे नियोजन, पाण्याखाली येणारे विजेचे ट्रान्सफॉर्मरच्या जागा बदलणे, औषधांची उपलब्धता याची माहिती दिली.

इचलकरंजी नगरपालिकेचे शहर अभियंता संजय बागडे यांनी व कुरुंदवाड नगरपालिकेच्यावतीने कृष्णा व पंचगंगा नद्यांमुळे येणाऱ्या महापुरात ज्या लोकवस्त्या पाण्याखाली येतात त्याचा सर्व्हे केला असल्याचे सांगितले. त्यांच्या स्थलांतराची, जनावरासाठी जागा, नागरिकांसाठी दूध व पाण्याची सोय, धोकादायक घरांना नोटिसा दिल्या आहेत. पूर परिस्थितीत समन्वयक नागरिक, नगरपालिकेचे अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यांत्रिक बोट, लाईफ जॅकेट, वाहने, फोकस लाईट, सर्च लाईट, २४ तास संपर्कासाठी मोबाईल, बिनतारी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

पोलीस दलातर्फे जिल्ह्यात पूरपरिस्थितीसाठी ठाणेनिहाय तीन विभाग केले असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरामुळे बंद होणाऱ्या रस्त्यांची, गावांची यादी केली आहे. या ठिकाणी सर्व साहित्य व वाहनासह यंत्रणा सज्ज असून पोलीस अधिकारी, कर्मचारी, राखीव पोलीस दलाची नियुक्ती केली आहे.

महावितरणतर्फे अधिकारी, कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पुराचे पाणी येईल तेथील विद्युतपुरवठा खंडित करणे, सुरळीत करणे, पर्यायी व्यवस्था करणे, नियंत्रण कक्षाव्दारे सतत संपर्क ठेवणे, लघु दाब व उच्च दाबाच्या विद्युत पुरवठ्याकडे लक्ष देणे, झाडाच्या फांद्या तोडणे या बाबीसाठी साधन सामग्रीसह यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. परिवहन विभागाने बंद होणाऱ्या मार्गाशिवाय पर्यायी मार्गाने वाहतूक सेवा देण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. प्रत्येक वाहक – चालकाचे मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक घेऊन सतत संपर्कात राहण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. बीएसएनएलच्यावतीने पावसाळ्यात मोबाईल टॉवर नादुरुस्त होऊन सेवा खंडित घेणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगितले.  

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,  पोलीस उप अधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.  

303 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा