कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

शाळा, महाविद्यालयांनी व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scolarship.gov.in वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही म्हटले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी नोंदणी दि. १५ नोव्हेंबरपर्यंत, सदोष पडताळणी व संस्था पडताळणी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत व नोडल अधिकारी पडताळणी दि. १५ डिसेंबरपर्यंत होणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी नोंदणी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत, सदोष पडताळणी व संस्था पडताळणी दि. १५ डिसेंबरपर्यंत व नोडल अधिकारी पडताळणी दि.३१ डिसेंबरपर्यंत होणार असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी नोंदणी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत, सदोष पडताळणी व संस्था पडताळणी दि. १५ डिसेंबरपर्यंत व नोडल अधिकारी पडताळणी दि. ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती घाटे यांनी दिली.