शिरोळ (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शिरोळ शहरासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन सुधारित २७ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होईल. लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील आणि सर्व नगरसेवक यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जीवन प्राधिकरण विभाग, नगरविकास विभाग या सर्व खात्यांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे शिरोळसाठी २६ कोटी ६९ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी झाला असून, लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही आमदार यड्रावकर यांनी सांगितले आहे. मागील वर्षभरापासून नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्यासह सर्वांना सोबत घेऊन आपण माजी नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

शिरोळ शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्हा सर्वांना यश आले आहे, असे सांगताना आता अवघ्या काही महिन्यांत शिरोळकरांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी मिळणार आहे, असेही आ. यड्रावकर यांनी म्हटले आहे. शिरोळ सारख्या महत्त्वाच्या शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.