मुंबई (प्रतिनिधी) : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवर पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. गुरुवारी ही घटना घडली असून, याप्रकरणी बांगर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित पोलिसानेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार दाखल केली; मात्र त्यानंतर बांगर यांनी कुठल्याही प्रकारची पोलीस बांधवाशी हुज्जत घातलेली नसल्याचे म्हटले.

आमदार बच्चू कडू हे गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. त्यावेळी बांगर यांच्यासोबत १० ते १२कार्यकर्तेही मंत्रालयात जात होते. इतके कार्यकर्ते एकत्र जात असल्याने मंत्रालयाच्या गेटवर उपस्थित असलेल्या पोलिसाने त्यांना नोंद करून जाण्यास सांगितले. त्यानंतर बांगर यांनी या पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची तक्रार या पोलीस कर्मचाऱ्याने केली आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत संतोष बांगर यांना विचारले असता त्यांनी ‘मी काल मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात जात होतो. त्यावेळी माझ्यासोबत माझे कार्यकर्ते होते. मी मंत्रालयाच्या गेटवर पोहोचलो असता, तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मला ओळखले नाही. तेव्हा माझ्या कार्यकर्त्याने त्यांना आमदार आहेत असे सांगितले. यानंतर त्या पोलिसाने जय महाराष्ट्र करत आम्हाला आत जाऊ दिले’, असे त्यांनी सांगितले.

शिवाय, ‘मी वाद घातला असेल तर, तिकडे सीसीटीव्ही आहेत, त्यामध्ये सगळे समजेल. जो पोलीस सकाळ ते संध्याकाळ तिथे ड्युटी करतो त्याच्याशी मी कोणताही वाद घातलेला नाही. मला मुख्यमंत्री शिंदेंनी कोणतीही समज दिलेली नाही. आमदारांसोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना आतमध्ये असेच जाऊ दिले जाते. पासेस विचारले जात नाहीत, कारण आमदार सोबत असतात. पासेस विचारले असते तर वाद झाला असता ना’, असेही संतोष बांगर यांनी म्हटले.