Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – करटाला पुन्हा एकदा तोंड फुटले…

पाचगावचा पाणी प्रश्न म्हणजे ‘करटा’च्या दुखण्यासारखा आहे. गेली कित्येक वर्ष या ‘करटा’मुळे पाचगाव आणि आजूबाजूच्या १८ हून अधिक कॉलन्यांमधील रहिवाशांना केवळ दुखणे सहन करावे लागत आहे. काही केल्या त्यावर अंतिम उपचार होत नाही. त्याची ठुसठुस (वेदना) सहन करण्यापलीकडची असते. करट इतरत्र असेल तर दाखवता येते अन् सांगता येते. पण, अवघड जागी असेल तर ते दाखवताही येत नाही, अशीच अवस्था पाचगावच्या पाणीप्रश्‍नाची झाली आहे.

ग्रामीण भागात करट सात कप्प्यांचे असते, असे म्हटले जाते. साधे करट लगेच बरे होते. पण, हे सात कप्प्यांचे हे करट लवकर बरे होत नाही. पाचगावचचा पाणीप्रश्नाला ‘राजकारण’ हा एक कप्पा आहे. या प्रश्नावरून राजकारण्यांनी पाचगाववासियांची फरपट केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेल्या अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. पण, प्रश्न काही मिटला नाही.

केवळ एका गावासाठी पाणी योजना परवडत नाही म्हणून कंदलगाव, मोरेवाडी, कळंबा या गावांसाठी एकत्रित योजनेच्या निमित्ताने या करटाला पुन्हा तोंड फुटले आहे. राजकारण्यांना जनतेच्या वेदनेशी नव्हे तर, आपल्या राजकारणाचे पडले आहे. त्यामुळेच या प्रश्नात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. सध्या मे महिना सुरू आहे.

पाचगाव, आर. के. नगरसह अन्य अठरा कॉलन्यातील रहिवाशांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दारात नळ कनेक्शन आहे. पण, आठ – आठ, दहा – दहा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे गरज भागवण्यासाठी टँकरने पाणी घ्यावे लागते. त्याचा आवाक्याबाहेरचा खर्च ग्रामस्थांना सहन करावा लागतो आहे.

लोकसभा निवडणूक नुकतीच संपली आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे. पाठोपाठ पाच ते सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीचा धुरळा उडेल. त्याची पेरणी आतापासूनच सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीत सत्ता संघर्षाची झलक पाहायला मिळणार आहे. पाणी पेटणार आहे, हे निश्चित. करटाला तोंड फुटले आहे. त्यातून केवळ घाण बाहेर येणार आहे. त्यामुळे या सत्ता संघर्षातून लोकांचा फायदा होणे अवघड आहे. वाहत्या जखमेवर उपचार करण्याऐवजी त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार सुरु आहे. करट एक आणि उपचार करणारे अनेक अशी अवस्था झाल्याने ते बरे होते, की आणखी चिघळते हे पहावे लागणार आहे.

ठसकेबाज

1,161 total views, 3 views today

One thought on “लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – करटाला पुन्हा एकदा तोंड फुटले…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा