कागल (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुळकूड येथील लिंगायत समाजाला वारंवार मागणी करूनही स्वतंत्र स्मशानभूमी (रुद्रभूमी) अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीचे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आज सुळकूड येथील लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, या समाजाच्या स्वतंत्र स्मशानभूमीचा प्रस्ताव १८ ऑगस्ट २०१८ रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे. या प्रस्तावात गायरान गट नंबर ५७५ मधील जागाही प्रस्तावित केली आहे; मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.

या अगोदरच्या सरकारच्या काळात या स्वतंत्र स्मशानभूमीच्या कामाबाबत केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाची नोंद घेऊन आज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. समाजाची योग्य मागणी लक्षात घेऊन याबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधितांना दिले आहेत. या शिष्टमंडळात भीमगोंड पाटील, अमोल शिवई, तात्यासो बाळान्ना, अशोक धाम्मान्ना, बापूसो देशपांडे, भीमगोंड मुद्दांना, रावसाहेब कुंभार, अण्णासाहेब माळी, प्रथमेश पाटील, अजित पार्वते व मल्गोंडा पार्वते यांचा समावेश होता.