मुंबई (प्रतिनिधी) येत्या आठवडाभरात साडेअठरा हजार जागांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासकीय नोकरी मिळालेल्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते.

केंद्राच्या वतीने देशभरात ७५ हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन हजार जणांना आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या तरुणांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस म्हणाले की, येत्या आठवड्याभरामध्ये साडेअठरा हजार जागांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार आहे. महिन्याभरात साडेदहा हजार पदे ग्रामविकास विभागामार्फत भरली जाणार आहेत.

खासगी कंपन्यांमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी राज्य सरकार कंपन्यांसोबत करार करेल, असे जाहीर करून फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार देशभरात १० लाख जणांना शासकीय नोकऱ्या देणार आहेत. राज्यांनीही या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्याला सर्वात पहिले प्रतिसाद महाराष्ट्र राज्याने दिला. महाराष्ट्र सरकारने ७५ हजार शासकीय जागांच्या भरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार पुढील महिना किंवा सव्वा महिन्यात ग्रामविकास विभागातील रिक्त साडे दहा हजार जागा भरण्याची जाहीरात काढली जाईल.

सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रियेचे कामकाज सुरु झालेले आहे; मात्र ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकार विशेष काळजी घेणार आहे. चांगल्या एजन्सीज् शोधून त्यांना काम दिले जाईल. परीक्षा फी थोडीबहूत जास्त असेल पण भरती पारदर्शक होईल. टीसीएससारख्या कंपन्यांना भरतीचे काम देण्यात येणार आहे. वर्षभरामध्ये प्रस्तावित जागा भरल्या जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.