नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. १ आणि ५ डिसेंबर रोजी १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरात व हिमाचल विधानसभा निवडणुकीची ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती दिली.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी गुजरातमध्ये ४.६ लाख लोक प्रथमच मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाही, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुजरातमधील निवडणुकीची घोषणा जाणीवपूर्वक विलंबाने करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. या प्रश्नावर सीईसी राजीव कुमार म्हणाले की, आमच्या कृतीकडे लक्ष द्या. आमच्यावर नेहमीच आरोप होत असतात. निवडणुकीच्या वेळी अनेक पत्रे येतात, पण निकालानंतर सगळेच गप्प होतात.

सीईसी राजीव कुमार यांनी सांगितले की, गीर जंगलातील बनेज गावात राहणारे भरतदास दर्शनदास यांच्यासाठी एक मतदान केंद्र बनवले जाईल. या एकाच मतदाराकडून 15 जणांचे पथक मतदान करून घेण्यासाठी जाणार आहे. ते म्हणाले- भरतदास आपल्या गावाबाहेर पडून मतदान करू इच्छित नाही, म्हणून त्यांच्यासाठी मतदान केंद्र आणि मतदान पथक पाठवले जाईल.