बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे ते कोडोली रस्त्यावर असणाऱ्या बोरपाडळे गावच्या भोपा चितळी कमानीजवळ गॅस टँकर मंगळवारी रात्री उलटला. या टँकरमधून वायूगळती सुरु झाली. हा गॅस हवेमध्ये पसरल्याने ग्रामस्थांमध्ये एकच घबराट निर्माण झाली, मात्र कोडोली पोलिसांच्या तत्परतेने वायूगळती होऊनही मोठा अनर्थ टळला.

गॅस टँकर जीजे ०६ एक्स ३६४२ हा कॉन्फिडन्स पेट्रोलियम, नागपूर या कंपनीचा असून जयगड (जि. रत्नागिरी) येथून गॅस भरून तो नागपूरकडे जात होता. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास वळणाचा योग्य अंदाज न आल्याने उलटला. या टँकरमध्ये एकूण १८ टन एलपीजी गॅस भरलेला होता. शिवाय गॅस टँकरचे वजनही १८ टन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गॅस टँकर उलटूनही चालक रमेश महादेव मुंडे (वय ३२, भोलाई, जि. अमरावती) हा किरकोळ जखमी झाला. त्याने सीटबेल्ट लावल्याने जीवितहानी झाली नाही.

दुपारी तीन वाजेपर्यंत हवेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत गॅस पसरलेला होता. या मार्गावरून बोरपाडळे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अतुल ऊर्फ बंडा पाटील मार्गस्थ होत असताना त्यांना अपघाताचे दृश्य दिसताच त्यांनी बोरपाडळेचे पोलीस पाटील प्रशांत कडवेकर यांना फोन करून घटना कळवली. पोलीस पाटील कडवेकर यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांना माहिती दिल्यानंतर तत्परतेने कोडोली पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. त्यांनी गॅस गळती होत आहे हे लक्षात येताच बोरपाडळे ते वाठार या मार्गावरून होणारी वहातूक अन्य मार्गाकडे वळवली.

कंपनीस माहिती कळवून तातडीने एचपीसीएल कंपनीचा दुसरा रिकामा टँकर मागवून अपघातग्रस्त टँकरमधील गॅस त्यामध्ये भरण्यास सुरुवात केली. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत रोखण्यात आली होती. पन्हाळा पोलीस स्टेशनने देखील अतिरिक्त पोलीस कुमक पाठवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम, संपत पाटील, गोपाळ पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेनेभयभीत झालेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आणि कोडोलीचे सपोनि डोईजड यांनी आपल्या सहकार्‍यांसह रात्रीपासून आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवली नाही.

संबंधित विभागाची बेफिकिरी

या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग सुसाट असल्याने वळणाचा अंदाज येत नसला तरी या रस्त्यावर असणारे रिफ्लेक्टर वाढलेल्या वेलांमुळे पूर्णतः झाकले गेले आहेत. त्यामुळे रस्यावरील वळणाचा आणि लगेच असणार्‍या उंचवट्याचा अंदाज येत नाही. रिफ्लेक्टर आणि त्यावरील दिशादर्शक खुणा दिसल्या असत्या तर हा अपघात टळला असता अशी चर्चा घटनास्थळी होती.