धामोड (सतीश जाधव) : राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागात विखुरलेल्या धामोड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या धामोड, कोते, कोनोली, बुरंबाळी, तळगाव, पडसाळी आणि चौके या उपकेंद्रांमध्ये गेले अनेक वर्षे निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याच्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. 

संबंधित आरोग्य केंद्राच्या सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत असून, त्यांना नियमापेक्षा जास्त काम करावयास लागत आहे. या अतिरिक्त कामामुळेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी कौटुंबिक कारणामुळे गैरहजर असल्यास किंवा त्या कर्मचाऱ्याकडून नजरचुकीने एखादी चूक झाली असेल तर तिचा नको तितका बाऊ केला जातो आणि लोकप्रतिनिधी आणि समाजाकडून सत्यता न पाहता त्यांना धारेवर धरले जाते; परंतु वास्तविक पाहता अपुऱ्या कर्मचारी संख्येकडे लोकप्रतिनिधी, समाज यासाठी कोणीही जिल्हा आरोग्य विभागाकडे आवाज उठवत नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

धामोड आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रांमधील रिक्तपदे पुढीलप्रमाणे : आरोग्य सेविका हजर- तीन, रिक्त- चार, आरोग्यसेवक हजर-५, रिक्त- २, आरोग्य सहायिका हजर-१, रिक्त-१, आरोग्य सहायक हजर- १ रिक्त एक, प्रतिनियुक्ती हजर- एक, रिक्त एक, मेडिकल ऑफिसर रिक्त- एक, आरोग्यसेविका रिक्त- एक

प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी गेले अनेक दिवस करवीर तालुक्यातील शिरोली केंद्र येथे काम करत असून, त्यांचा पगार धामोड आरोग्य केंद्रामार्फत निघत आहे, हे कितपत योग्य आहे. या आरोग्य केंद्रामार्फत येणारी उपकेंद्रे ही वाडीवस्तीमध्ये विखुरलेली आहेत. आरोग्याच्या दृष्टीने येथील रिक्त पदे पाहता एखाद्यावेळी जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे या आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच परिसराचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी रिक्तपदाबाबत जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी  जनमानसातून केली जात आहे.