टोप (प्रतिनिधी) : पुलाची शिरोली (सांगली फाटा) ते अंकली पूल या दरम्यानचा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे. यासाठी तीन प्रस्तावित अॅक्शन प्लॅन (नकाशे) तयार करण्यात आलेले आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात भूसंपादन करावे लागणार आहे. त्यानंतर कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य जनरल मॅनेजर प्रशांत खोडस्कर यांनी दिली.

ते मंगळवारी दुपारी पुलाची शिरोली (सांगली फाटा) ते अंकली पूल दरम्यानच्या रस्त्याच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे पथक कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली.

सांगली फाटा ते अंकली पूल या दरम्यान पडलेले खड्डे व रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, पंचगंगा व कृष्णा नदीच्या महापुरामुळे बंद होणारी वाहतूक, महामार्गावर वारंवार होणारे लहान मोठे अपघात, वाहतुकीची कोंडी, व्यावसायिकांनी महामार्गालगत सुरू केलेले व्यवसाय व अतिक्रमणे अशा अनेक गोष्टींची या पथकाने पाहणी केली.

या महामार्गावर असणारी वाहतूक पाहता चार पदरी रस्ता बांधणी करावी लागणार आहे. चोकाक फाटा ते शिये फाटा हा नवीन होणारा प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग चार पदरी आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे; पण सांगली फाटा ते चोकाक व निमशिरगाव (जयसिंगपूर) येथील बायपास रस्ता ते अंकली पूल लगत असलेल्या शेतकऱ्यांचे भूसंपादन झालेले नाही. पहिल्या टप्प्यात ते करावे लागणार आहे. तीनपैकी कोणता प्रस्ताव फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करुन यापैकी एक प्रस्ताव केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कामास सुरुवात होईल, अशी माहिती खोडस्कर यांनी दिली.

यावेळी केंद्रीय महामार्ग प्राधिकरण जनरल मॅनेजर कृष्णेंद्र द्विवेदी, जिल्हा प्राधिकरण संचालक पंदारकर, खासदार धैर्यशील माने यांचे स्वीय सहायक रणजित जाधव आदी उपस्थित होते.