सोलापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजित यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते. किरण लोहार यांच्या सोबतच चैतन्य भागातील एका लिपिकास यावेळी पकडण्यात आले आहे.

स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतले आहे. किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण १३ महिने झाले होते. त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती, अशा तक्रारी वारंवार ऐकाव्यास मिळत होत्या.

शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जि.प. च्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जि.प.मधून एकतर्फी कार्यमुक्त केले; मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते.

किरण लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या चौकशीचा अहवाल माजी जि.प. अध्यक्षांकडे पाठवला होता. चौकशी समितीने लोहार यांच्या कामकाजासंबंधी ४३ तक्रारींची चौकशी केली होती. त्यामध्ये कर्तव्यात कसूर करणे, दप्तर दिरंगाई करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे, हेतूपूर्वक जि. प.च्या सर्वसाधारण सभेत गैरहजर राहणे असे आरोप लोहार यांच्यावर ठेवण्यात आले होते.

किरण लोहार हे जेव्हा कोल्हापूर जि.प. चे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत होते, तेव्हा कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली होती; पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचे शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले होते. त्यानंतर या संस्थेच्या विरुद्ध शिक्षण संचालकांच्या तक्रारीनंतर पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये २०१९ मध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता. टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.