कागल (प्रतिनिधी) : येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गळितास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफआरपी प्रतिटन रुपये ३००० देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे, सहकारातील आदर्श स्व विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला हा कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसास चांगला दर मिळालाच पाहिजे या भूमिकेशी शाहू नेहमीच ठाम राहिला आहे. चांगला ऊस दर देण्याबरोबर राष्ट्रीय व राज्य पातळीवरील बक्षीस मिळवण्याची परंपरा असो, किंवा उच्चांकी गळीत, उच्चांकी साखर उत्पादन असो, अशा सर्वच बाबतीत स्वतःचे विक्रम मोडत शाहू कारखान्याने सहकारातील आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली आहे.
हंगाम २०२२-२३ साठी शाहू कारखान्याने ११ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ते पूर्ण करण्यासाठी सभासद, ऊस पुरवठादार यांनी आपला संपूर्ण उस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक डॉ. डी एस पाटील, बॉबी माने, प्रा. सुनील मगदूम, शिवाजीराव पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.