पन्हाळा (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. महिन्याचा विकएंड आणि संडेमुळे गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.

पन्हाळगडावरील तीन दरवाजा, सज्जा कोटी, लता मंगेशकर बंगला परिसरात पर्यटकांची रेलचेल आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे गडावरील हॉटेल हाऊसफुल्ल आहेत, तर लहान-मोठ्या हॉटेल तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायीकांना चांगले दिवस आले आहेत. पर्यटकांना गाडी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मात्र पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. चालू हंगामात रेल्वे, मोटारसायकल, रिक्षा चारचाकी, लंडन बस, सायकल हे लहान मुलांचे मोठे आकर्षण ठरत आहे. तबक उद्यान ते तीन दरवाजा असा हा मार्ग असल्याने याठिकाणी मोठी गर्दी आहे.

नगरपालिका प्रवासी कराच्या माध्यमातून लाखोंचा कर गोळा करत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रोज एक लाख प्रवासीकर मिळाल्याचे प्रशासनाने सांगीतले. तर तीन दरवाजा परिसरात बुरुजावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणींची मोठी गर्दी दिसत आहे. तर पर्यटकांनी पन्हाळा भरल्याने व्यावसायिक खुष झाले आहेत.