कोल्हापूर (प्रतिनिधी) टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमधील बडोदाला हलवण्यात आल्याने राज्याचे मुख्यमंत्री गुजरात धार्जिणे झाले असल्याचा आरोप ‘आप’चे युवा जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला. अशा गुजरात धार्जिणे, गद्दार मुख्यमंत्रांनी आता पायउतार होऊन गुजरातला जावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

दीड लाख कोटींची गुंतवणूक असणाऱ्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पनांतर आता लष्करी विमाने तयार करणारा टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमधील बडोदाला हलवण्याचा निर्णय झाला. भारतीय हवाईदलाचे सी-२९५ विमाने तयार करण्यासाठी टाटा-एअरबस २२  हजार कोटींची गुंतवणूक करणार होते. यासाठी नागपूर येथील जागा देऊन हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असे मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे संगितले होते; परंतु शिंदे-फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला.

वेदांता-फॉक्सकॉनच्या मागोमाग टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला हलवण्यात येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मूग गिळून गप्प आहेत. दोन लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेले प्रकल्प गुजरातला जातात याचा सरळ अर्थ होतो की, या सरकारला राज्याचे भले व्हावे असे वाटत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रांनी गुजरातला जाणे योग्य ठरणार असल्याचे उत्तम पाटील यांनी म्हटले आहे.