कळे (प्रतिनिधी) : एफआरपी अधिक गत हंगामातील दुसऱ्या हप्तापोटी ५५० रुपये द्यावेत, उसाला रास्त भाव मिळालाच पाहिजे आदी प्रमुख मागण्यांसह कोल्हापूर-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावरील कळे-सावर्डे धरण फाटा येथे शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी या मार्गावरून ऊस वाहतूक करणारी काही वाहने काही काळ आंदोलकांकडून अडविण्यात आली होती.

शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक बाजूंनी शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. शासन नियमानुसार गतवर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांना देणे असलेली रक्कम काही कारखान्याकडून अद्याप देण्यात आलेली नाही. ती रक्कम त्वरित शेतकऱ्यांना वर्ग करावी, अशी मागणी शरद जोशी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव पांडुरंग जाधव यांनी केली.

कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब परळीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते आबा कांबळे (काटेभोगाव), नामदेव पाटील, सरदार आंग्रे (काटेभोगाव), संजीवनी पाटील, बनुबाई पाटील, सुलाबाई  गुरव, विजया चौगुले, शालाबाई चौगुले (सर्व रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.