उत्तूर (प्रतिनिधी) : दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत, असा टोला शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आ. हसन मुश्रीफ यांना लगावला. झुलपेवाडी, ता. आजरा येथे प्रोत्साहन अनुदानासाठी यशस्वी पाठपुराव्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने घाटगे यांचा सत्कार व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

घाटगे म्हणाले, कागलच्या आमदारांनी तीनशे कोटी रुपयांचा स्वतःचा खासगी कारखाना केवळ तीन वर्षात उभारल्याने त्यांना भांडवलदार ही पदवी दिली आहे. स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवणाऱ्या भांडवलदार आमदारांनी गेल्या अडीच वर्षात प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठीच्या जाचक अटी काढून टाकण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांवर अन्याय झाला असता. महाविकास आघाडी सरकारने घातलेल्या जाचक अटी शिंदे-फडणवीस सरकारने काढल्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे, मात्र भांडवलदार आमदारांनी हे अनुदान आपल्यामुळेच मिळाल्याच्या अविर्भावात चौथ्यावेळी अभिनंदनचे बोर्ड लावत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतरच अभिनंदनचे फलक लावले. हाच त्यांच्या व आमच्यातील कामातील पद्धतीचा फरक आहे.

अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी म्हणाले, आजरा- गडहिंग्लज-उत्तूर विभागावर विद्यमान लोकप्रतिनिधींनी विकासकामांसह कामाच्या वाटपातही अन्याय केला आहे. तो दूर करण्यासाठी शाश्वत विकासाची दृष्टी असणाऱ्या व सत्ता नसताना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या समरजितसिंह यांच्या रूपाने हक्काचा आमदार निवडून देऊया.

यावेळी तालुका सरचिटणीस आतिषकुमार देसाई, सरपंच नामदेव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उद्योजक प्रकाश चव्हाण, मारुती चौगुले, विष्णू देसाई, शिवाजी मोहिते, भिकाजी पाडेकर आदी उपस्थित होते. स्वागत तानाजी पावले यांनी केले. सुनील पाडेकर यांनी आभार मानले.