पिंपळगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मुरुक्टे, मानवळे परिसरात विहिरीवरील विद्युत मोटर चोरीचे प्रकार चालू आहेत. मुरुक्टे येथील शिवाजी लक्ष्मण बेलेकर यांचे डिझेल इंजिन, एक मोटर चोरीस गेली आहे, तर मानवळे येथील तुकाराम नारायण डाकरे यांचेही शेतातील विहिरीवरील डिझेल इंजिन चोरीस गेले आहे. त्यामुळे पिंपळगाव परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.

परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवर डिझेल इंजिन किंवा मोटर बसविलेल्या आहेत. दिवसभर शेतीची कामे करुन शेतकरी रात्री घरी विश्रांती घेण्यासाठी झोपला असताना भुरटे चोर शेतातील साहित्य चोरुन नेत आहेत. एकाच रात्री अकरानंतर मुरुक्टे व मानवळे या दोन ठिकाणी चोरी केली आहे. डाकरे कुटुंबीय विहिरीपासून शंभर मीटर अंतरावर मुक्कामाला शेतघरात रहातात. तरीही येथे चोरी झाली आहे.