गगनबावडा (संभाजी सुतार) : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील असळज येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. डी. वाय. सहकारी साखर कारखाना चालू झाल्यामुळे या रस्त्यावर ट्रॅक्टरची वाहतूक वाढली आहे. भरलेला ट्रॅक्टर खड्ड्यांमध्ये जाऊन आतापर्यंत दोन-तीन ट्रॅक्टर उलटले आहेत. या रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक अपघात घडले आहेत. तरीही याकडे महामार्ग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमधून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूरपासून गगनबावड्यापर्यंत ठिकठिकाणी रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले असून, प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गगनबावडा तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. या पूरस्थितीमुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला दिवस आणि रात्र ही वैऱ्याची ठरत आहे. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील रस्त्याबाबत खड्ड्यांची समस्या अनेक वृत्तपत्रांनी मांडली; परंतु या रस्त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. थोडाफार रस्ता दुरुस्त केला; परंतु तो फक्त दिखाव्यापुरता दुरुस्त झाला. रस्त्याची दुरवस्था अजूनही जैसेथेच आहे. यासाठी रस्ता पूर्णतः खड्डेमुक्त होणे गरजेचे आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

या मार्गावर प्रचंड रहदारी असून, अनेक लहान-मोठी वाहने भरधाव वेगाने असतात. बऱ्याच वेळा रस्त्यात पडलेले खड्डे प्रवाशांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे क्षणाक्षणाला अपघात होत असतात. अनेक वाहन चालकांमध्ये या ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. असळज, शेणवडे, साळवण पोलिस ठाणे व लोंघे पुढे अनेक ठिकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे.