Breaking News

 

 

राज्य सरकारला दिलासा : दुष्काळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल !

मुंबई (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र चारा आणि पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारसमोर आचारसंहितेचा अडसर होता. मात्र राज्य सरकारच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता या उपाययोजनांची अंमलबजावणी करता येणे शक्य होणार आहे. मात्र आयोगाने या कामांची कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी करू नका, अशी सूचना केली आहे.

सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच गुरांसाठी चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने यापूर्वीच १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने ४, ७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती. पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल ही कामेही करणे गरजेचे आहे. २००९ मध्ये अशाच प्रकारची परवानगी देण्यात आली होती. ही अनुमती दिल्यास दुष्काळी उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होईल, असेही राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. निवडणूक आयोगानं ही विनंती मान्यता केली आहे. निवडणूक पार पडलेल्या ठिकाणी कामे करण्यास हरकत नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र केलेल्या कामाची प्रसिध्दी न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.  

513 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग