सिडनी : टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या सुरेख खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराटने ४४  चेंडूत ६२, सूर्याने २५ चेंडूत ५१ आणि रोहितने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल वॉन मेकर्न यांनी १-१ गडी बाद केला.

शेवटच्या ५  षटकात ६५ धावा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांना डच गोलंदाजांसमोर फार काळ मोकळेपणाने खेळता आले नाही. पॉवर प्लेच्या ६ षटकांत भारताची धावसंख्या ३८/१ होती. १० षटकांनंतर भारतीय संघ ६७/१ पर्यंतच पोहोचू शकला. टीम इंडियाची धावसंख्या १५ षटकांअखेर ११४/२ होती. भारताने शेवटच्या पाच षटकात ६५ धावा केल्या.

रोहितने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. यात ४ चौकार आणि ३ षटकार होते. अर्धशतक झळकवल्यानंतर वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. विराट-रोहितने दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.

पाकविरोधात ४  धावा करून बाद झालेल्या के एल राहुल याचा नेदरलँड विरोधातही फ्लॉप शो कायम राहिला. तिसऱ्या षटकाचा चौथा चेंडू मिडल लेगवर फुलर होता. राहुल तो फ्लिक करण्याच्या प्रयत्न होता; पण आत येणाऱ्या चेंडूने त्याला हुलकावणी दिली. त्यानंतर अंपायरने तत्काळ आपले बोट वर केले. त्याने १२ चेंडूंत ९ धावा केल्या. त्याचा विकेट मीकेरेनने घेतला. तथापि, रिप्लेमध्ये राहुल बाद नसल्याचे दिसून आले. बॉल लेग स्टंपच्या बाहेर जात होता. रोहित शर्माने नकार दिल्यामुळे राहुलला डीआरएस घेता आला नाही.

या सामन्यात विराट कोहलीने नाबाद अर्धशतकीय खेळी केली. या कामगिरीसह विराटने वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीच्या नावावर सध्या ९८९ धावांची नोंद आहे. या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने टी-२० विश्वचषकातील ३१ डावात ९६५ धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यापूर्वी विराट ९२७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. ख्रिस गेलला मागे टाकण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या ३८ धावांची आवश्यकता होती